अमरावती (आंध्र प्रदेश) – आंध्र प्रदेशातील ओन्गोल येथील स्थानिक न्यायालयाने एका कुख्यात गॅंगच्या 12 सदस्यांना हत्येच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली, तर याच टोळीच्या अन्य 7 जणांना महामार्गावरील लुटमारी आणि हत्येच्या आरोपांखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रकासम जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपींना सात प्रकरणांमधील तीन प्रकरणात दोषी ठरवले. यामध्ये एकूण 13 जणांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये ट्रक चालक आणि त्यांच्या मदतनिसांचा समावेश होता. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाणे बाकी आहे.
सय्यद अब्दुल समाद उर्फ मुन्ना याने राजकीय वरदहस्त मिळवून 2008 पासून टोळीच्या माध्यमातून लुटमार करायला सुरुवात केली होती. त्याने सुरुवातीला गुप्त खजिना मिळवून देण्याच्या आमिषाने काही श्रीमंतांची फसवणूक केली होती. खंडणी उकळून मुन्ना आणि त्याचे साथीदार संबंधित व्यक्तीची हत्या करत असत. नंतर त्यांनी पोलीस असल्याचे भासवून चेन्नई-कोलकाता महामार्गावर लुटमार करायला सुरुवात केली होती.
ट्रक चालक आणि सहायकाची हत्या करून ट्रकमधील मालाची परस्पर विक्री ते करत असत. तसेच पळवलेल्या ट्रकचीही विल्हेवाट लावली जात असे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.