महाबळेश्वर (प्रतिनिधी) -महाबळेश्वर तालुक्यातील करोनाबाधिताच्या बाबतीत पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला; परंतु त्याच बैठकीला एका नगरसेविकेच्या पतीला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संतप्त पत्रकार व नगरसेवक यांच्यात वादंग झाला. तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने पत्रकार शांत झाले
मुंबईमधून एक 23 वर्षीय युवक जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून ट्रकमधून साताऱ्यात आला. साताऱ्यात तो वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गेला असता, त्याचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. ही परिस्थिती कशी हाताळावी, याचा विचार करण्यासाठी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक रविवारी पालिकेत सुरू होती. याची माहिती मिळताच काही पत्रकार पालिकेत गेले. तेथे त्यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. बैठकीनंतर अधिकारी माहिती देतील, या अपेक्षेने पत्रकार सभागृहाबाहेर प्रतीक्षा करत होते. त्याच वेळी एका नगरसेविकेचा पती सभागृहात जाऊन बैठकीत बसला. शासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत नगरसेविकेच्या पतीचा काय संबंध? त्याला प्रवेश मिळाल्याने पत्रकार संतप्त झाले होते. तेव्हा नगरसेवक कुमार शिंदे तेथे आले आणि या प्रकरणाची माहिती उद्या मिळेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर आम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. प्रशासनाच्यावतीने बोलणारे नगरसेवक कोण? बैठकीत पत्रकारांना प्रवेश नसताना नगरसेविकेचा पती कसा आला, असे प्रश्न कुमार शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावरून कुमार शिंदे व पत्रकार यांच्यात वादावादी झाली. हा गोंधळ ऐकुन तहसीलदार सुषमा चौधरीगपाटील बाहेर आल्या आणि त्यांनी पत्रकारांना शांत केले.
तुम्हाला थोड्या वेळाने माहिती दिली जाईल. कृपया गैरसमज करून घेऊ नका, असे त्या म्हणाल्या. अधिकाऱ्यांच्या बैठकीत नगरसेविकेच्या पतीला प्रवेश आणि पत्रकारांना मज्जाव, हे योग्य नाही, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले, तेव्हा पत्रकारांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. यापुढे योग्य ती खबरदारी घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. वास्तविक बैठकीनंतर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना सामोरे जाणे आवश्यक होते; परंतु त्यांनी बैठकीतून बाहेर न येता नगरसेवकांना पुढे केल्याने पत्रकार चिडले. मुख्याधिकाऱ्यांनी परीस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असती तर वादंग टळले असते.