भवानीनगर, (वार्ताहर) – विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून तालुक्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, तसेच अपक्ष उमेदवार असे विधानसभेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवार उभे राहणार असल्याने खर्या अर्थाने इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत दिसणार आहे.
मात्र सध्याचे इंदापूर तालुक्याचे विधानसभेचे राजकीय वातावरण पाहता ही विधानसभेची निवडणूक म्हणावी एवढी कोणत्याच उमेदवाराला सोपी राहिलेली नाही. यामुळे खर्या अर्थाने मतदार राजा आपल्या इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल हा फक्त मतदार राजाच ठरवू शकतो व याच मतदार राजाला आपलेसे करण्याची भूमिका सध्या तरी उमेदवार करताना दिसत आहेत.
इंदापूर तालुक्याचा विकास हा माजी मंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला असल्याचा दावा स्वतः दत्तात्रय भरणे हे करीत असून त्यांचे कार्यकर्ते देखील करत आहेत. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दत्तात्रय भरणे हे पोहोचले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून संपूर्ण तालुक्यातील गावागावात विकासाची गंगा आणलेली आहे.
अनेक गावांमध्ये रस्त्याची दुरवस्था असेल, मंदिरांची दुरवस्था असेल, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील अशा सर्व अडचणी सोडवण्याचे काम आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे व याच जोरावरती त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला सुरुवात केली असून विकासाचा मुद्दा घेऊन दत्तात्रय भरणे हे या निवडणुकीत उतरले आहेत.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षामध्ये प्रवेश करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली आहे. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याचा दांडगा अभ्यास असून त्यांनीही मंत्रिपद भोगले असल्याने त्यांच्या काळात त्यांनी देखील तालुक्याचा विकास केला आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांनीही त्यांचा काळ पूर्णपणे गाजवला असूनगरिकांच्या मनात घर निर्माण केले आहे.
तालुक्याच्या विकासासाठी जो काही नीती उपलब्ध करायचा असतो तो हर्षवर्धन पाटील यांनी देखील त्यांच्या काळामध्ये जनतेसाठी आणलेला आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून जनतेला आपलेसे केले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये सोनाई परिवाराच्या माध्यमातून दशरथ दादा माने यांनी चांगल्या प्रकारे संपर्क साधला असून त्यांचे चिरंजीव प्रवीण माने यांनी देखील गेले दहा ते पंधरा वर्षांमध्ये जनतेच्या प्रश्नांना महत्त्व दिल्याने त्या कामांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बस्तान माने यांनी बसवले आहे.
यामुळे येणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने या तीन उमेदवारांमध्ये विधानसभेसाठी काटे की टक्कर असा सामना होणार असून जनता कोणाला साथ देणार आहे हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
लोकसभेपासून चित्र पालटले
लोकसभेच्या निवडणुकीपासून खर्या अर्थाने मतदार राजा हा मतदान रूपाने काय करू शकते हे चित्र संपूर्ण देशांनी पाहिले आहे. त्यामुळे मतदार राजा हा खरा श्रेष्ठ ठरला आहे. म्हणून होणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून विधानसभेची निवडणूक मात्र इंदापूर तालुक्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे.
नाराजांचा गट कोणाच्या बाजूने
विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातून उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच होणार असून इंदापूर तालुक्यातील ज्या त्या पक्षातील जे काही नाराज कार्यकर्ते आहेत ते कोणत्या उमेदवाराला साथ देतील यावर देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गणिते मांडले जाणार आहेत .
त्यामुळे राजकारणामध्ये येणार्या काळामध्ये बरेच राजकीय समीकरणे बदलणार असल्याने इंदापूर तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार असून होणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्याचे राजकीय पटलावर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.