अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक यावेळी जरा जास्तच गाजली. ही निवडणूक अगदी चुरशीची होत असताना केंटुकीतील रॅबिट हॅश या छोट्या गावाने नेता म्हणून फ्रेंच बुलडॉग जातीच्या विल्बर बीस्ट नावाच्या कुत्र्याची निवड केलेली आहे. रॅबिट हॅश येथे गावच्या प्रमुखाला मेयर म्हणजेच महापौर म्हणून संबोधले जात असल्याने आता विल्बर हा गावचा महापौर असणार आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीनुसार बिल्बर बीस्टने ही निवडणूक 13,143 मतांनी जिंकलेली आहे. रॅबिट हॅश हिस्टॉरिकल सोसायटीच्या हवाल्याने फॉक्स न्यूजने ही बातमी दिलेली आहे. या निवडणुकीच्या स्पर्धेत त्याने सहा हजार डॉलरहून अधिक निधी जमवला. त्याला मिळालेल्या प्रत्येक मतामागे रॅबिट हॅश सोसायटीला एक डॉलर आणि जमवण्यात आलेली सगळी मदत मिळणार आहे. या स्पर्धेत विल्बरला अन्य 13 कुत्री, एक गाढव, एक कासव, एक मृत मांजर आणि एका माणसाचे आव्हान होते. 2018 मध्ये या गावची लोकसंख्या 426 इतकी होती.
त्यामुळे आता या छोट्या गावचा महापौर म्हणून विल्बर बीस्टच्या नावाची घोषणा झालेली आहे. एकूण 22,985 मतांपैकी निम्म्याहून अधिक मते घेत तो विजयी झाला आहे. या गावाची मालकी रॅबिट हॅश हिस्टॉरिकल सोसायटीकडे आहे. त्यांनी बुधवारी ही माहिती फेसबुकवरून जाहीर केलेली आहे. ही मते उमेदवाराने किती निधी जमवला यावरून ठरवली जातात.
विल्बरने जॅक रॅबिट आणि पॉपी हे दोन उमेदवार अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गावची दूत म्हणून 12 वर्षांच्या लेडी स्टोनने स्वतःचा पद कायम राखले आहे. विल्बरने पदभार स्वीकारला की, रॅबिट हॅश हिस्टॉरिकल सोसायटी आणि अन्य सामाजिक कामांसाठी निधी जमवण्यासाठी मदत करणे हे त्याचे प्रमुख काम असणार आहे. या आधी 22 वर्षांपूर्वी या गावात महापौरपदासाठीची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कुत्र्यांनीच महापौरपदावर ताबा ठेवलेला आहे. मावळता महापौर पिटबुल जातीचा ब्रायन याच्याकडून बिल्बर सूत्रे स्वीकारणार आहे.