वाल्हे (पुणे) – पुरंदर तालुक्यांतील 17 गावांत बुधवारी (दि. 24) 56 करोनाबाधित आढळून आले. सलग तिसऱ्या दिवशी बाधितांचा आकडा पन्नासी पार गेल्याने करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जेजुरी येथील बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी जोर धरीत आहे.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये बुधवारी 98 संशयितांपैकी 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सासवड (23), सोनेरी (3), पिसर्वे, शिवरी, भिवडी (प्रत्येकी 2), वाल्हे, सोमर्डी, कोथाळे, आंबळे, दिवे, वाळुंज, मावडी सुपा, चांबळी (प्रत्येकी एक) आणि तालुक्या बाहेरील हडपसर येथील 1 असे एकूण 41 बाधित आढळून आले.
तर जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये 60 संशयितांपैकी 16 जण पॉझिटिव्ह आढळले. यात जेजुरी (11), कोळविहिरे (3), पांडेश्वर, जवळार्जुन (प्रत्येकी 1) असे एकूण 16 बाधित आढळून आले.