बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र्रात पाहायला मिळाले. या प्रकरणात पहिल्यांदाच एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील ?
ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत, आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा आणि लवकरात लवकर जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्या. महाराष्ट्रासमोर हे एक उदाहरण ठेवा, जर पुन्हा कोणी असं केलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं इम्तियाज जलील म्हणाले.
बीडच्या पालकमंत्री पदाबाबत इम्तियाज जलील म्हणाले पॉलिटिकली खूप चांगला गेम त्यांनी खेळला आहे, अजित पवार यांना माहित आहे की पुण्याचंही पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे आणि आता बीडचंही. याचा अर्थ आहे की फक्त कागदावरच ते पालकमंत्री असणार आहेत, आणि प्रत्यक्षात बीडचा पालकमंत्री म्हणून दुसरंच कोणीतरी काम करेल असं जलील यांनी म्हटलं आहे.