Imtiaz Jaleel : सध्या देशभरात चर्चेत असलेला ‘छावा’ चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील मुघल बादशाह औरंगजेबाच्या चित्रणावरून तरुणांची मने भडकवली जात असून, नागपूरच्या दंगलीसाठी हा चित्रपट कारणीभूत आहे, असा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मौलाना रझवी यांनी पत्रात म्हटलं आहे की, ’छावा’ चित्रपटात औरंगजेबाला ज्या पद्धतीने सादर केलं गेलं, त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष पसरला आहे. यातून अशांतता निर्माण होत असून, नागपूरच्या दंगली हे त्याचाच परिणाम आहे.”
“भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आमच्यासाठी तो केवळ एक मुघल शासक आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही.” त्यांनी नागपूरमध्ये शांतता राखण्यासाठी स्थानिक उलेमा आणि इमामांशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं.
दरम्यान, आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘सिनेमा बनवायचाच होता तर दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे किंवा थ्री इडियटसारखा बनवायचा होता. तीन तास सर्वांचं मनोरंजन देखील झालं असतं’ असं म्हणाले आहेत.
इम्तियाज जलील म्हणाले की, ‘छावा सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे, त्या पहिल्यानंतर असं वाटतं की, दुख इस बात का नही की धर्म का धंदा चल रहा है, दुख इस बात का है इस धर्म के धंदे मे पढा लिखा भी अंधा हो रहा है.
जे शिकलेले लोक आहेत त्यांना देखील असं वाटतं की 400 वर्षांपूर्वी औरंगजेबाने जे काही केलं, त्याचा हिशोब इम्तियाज जलीलकडे मागू…’ असं इम्तियाज जलील यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘सिनेमा बनवायचाच होता तर दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे किंवा थ्री इडियटसारखा बनवायचा होता. तीन तास सर्वांचं मनोरंजन देखील झालं असतं. तुम्ही सिनेमा बनवला आणि कशी क्रुरता होती दिखवली. मी सिनेमा पाहिलेला नाही.
पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुद्दे होते शेतकऱ्यांचे, लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं 2100 रुपये देण्याचं, नोकऱ्यांचा प्रश्न आहे… विधानसभा यासाठी आहे. पण सर्व आमदार, मंत्री कुठे गेले? तर सिनेमा पाहण्यासाठी गेले. मग हा सिनेमा तुम्हाला राजकीय फायदा देतो म्हणून तुम्ही सगळे सिनेमा पाहण्यासाठी गेले…’ असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.
‘छावा’ सिनेमामुळे नागपूरमध्ये उसळी दंगल?
नागपूरमध्ये नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराने राज्यभर खळबळ माजवली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीतून सुरू झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तणाव निर्माण झाला. या घटनेत जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक झाली, ज्यात 34 हून अधिक पोलीस जखमी झाले आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी मुख्य सूत्रधार फहिम खानला अटक केली असून कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मौलाना रझवी यांनी ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या चित्रणामुळे तरुण भडकले आणि हिंसाचाराला चिथावणी मिळाली, असा दावा केला आहे.