मुंबई – खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीसोबत येण्यास एमआयएम पक्ष तयार असल्याचे सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘शिवसेनेने आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलंय’ असं वक्तव्य केलंय. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान मोदींनाही मान्य नसावं. फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री झाले होते.’ असं खडसे यांनी सांगितलं.
Imtiaz Jaleel MIM offer to MVA | इम्तियाज जलील यांची ऑफर…
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएमने भाजपची बी टीम असल्याप्रमाणे काम केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जलील यांनी, आपला पक्ष महाविकास आघाडीत सामील होऊन या तीन चाकी रिक्षाचे चार चाकी रिक्षामध्ये रूपांतर करू शकतो. अशी ऑफर दिली होती. जलील यांच्या ही ऑफर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी नाकारली होती. मात्र यावरून भाजपने शिवसेनेला टार्गेट केलं होत.
Fadanvis on Shivsena over alliance with MIM | काय म्हणाले फडणवीस…
याबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी, “आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात” अशी प्रतिक्रिया दिली होती.
Eknath Khadse on Devendra Fadanvis | खडसेंची प्रतिक्रिया…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “नरेंद्र मोदींनाही देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे. देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. त्या मंत्रीमंडळात मीसुद्धा होतो. आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन त्यांनी त्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. अलिकडे ते जी वक्तव्ये करत आहेत ती नैराश्यातून आलेली असावीत.” असे सांगितले.