इम्रान यांनी बदलला पाकिस्तानचा आरोग्यमंत्री

ऐन करोना संकटात सरकारची नाचक्की

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी नव्या आरोग्य मंत्र्याची नियुक्ती केली. ऐन करोना संकटात पाकिस्तानचा आरोग्य मंत्री बदलावा लागल्याने इम्रान सरकारची नाचक्की झाली आहे.

पाकिस्तानात करोना फैलाव रोखण्यात अपयश आल्याने इम्रान सरकार चौफेर टीकेचे धनी बनले आहे. त्या टीकेमुळे व्यथित झालेल्या डॉ.झफर मिर्झा यांनी मागील आठवड्यात त्या देशाच्या आरोग्य मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी डॉ. फैसल सुलतान यांची नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तानात 18 ऑगस्ट 2018 ला इम्रान यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यांच्या सरकारमध्ये आमीर कयानी पहिले आरोग्य मंत्री बनले.

मात्र, औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने मागील वर्षी त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर मिर्झा आरोग्य मंत्री बनले. आता त्यांनाही पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पाकिस्तानला तिसरा आरोग्य मंत्री मिळाला आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थांना करोनाची लागण झाल्याने पाकिस्तानच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

आधीचे आरोग्य मंत्री मिर्झा यांनाही करोना संसर्ग झाल्याने पाकिस्तानचे आणखीच हसे झाले. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 80 हजारांवर गेली आहे. तर करोनाने आतापर्यंत पाकिस्तानात सुमारे 6 हजार बाधितांचा बळी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.