इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सर्वसमावेशक सरकार स्थापन झाले नाही, तर तेथे यादवी युद्ध सुरू होईल आणि तेथे दहशतवाद सहज फोफावू शकेल, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे इस्लामविरोधी असेल, असेही खान यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील हंगामी सरकारमधील उर्वरित मंत्र्यांची घोषणा तालिबानच्या प्रवक्त्याने मंगळवारी केली. या मंत्रिमंडळात आता किंवा काही काळानंतर जर सर्व गटांचे प्रतिनिधी सहभागी करन घेतले नाही, तर तेथे यादवी युद्धाला सुरूवात होईल, असे खान म्हणाले. एका मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
अफगाणिस्तानात अस्थिर, गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. दहशतवाद वाढण्यासाठी अगदी पोषक वातावरण तेथे निर्माण होईल. ही एक चिंतेची बाब आहे. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबान सरकारला अधिक थोडा अवधी दिला पाहिजे, अशी अपेक्षाही इम्रान खान यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये ताजिक, हाजरा आणि उझबेकींचा सहभाग असलेले सरकार स्थापन करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानबरोबर चर्चा सुरू केली असल्याचे खान म्हणाले होते.
तालिबान सरकारला मान्यता दिली जावी, यासाठी सर्व शेजारी देशांनी एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.