इम्रान खान यांच्या वेतनात चौपट वाढ?

वृत्तामुळे पाकिस्तान सरकारची दमछाक

कराची: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वेतनात चौपट वाढ झाल्याच्या एका वृत्ताने त्या देशात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, ते वृत्त निराधार असल्याचा खुलासा करताना पाकिस्तान सरकारची अक्षरश: दमछाक होत आहे.

इम्रान यांना दरमहा 2 लाख रूपयांपेक्षा थोडे अधिक वेतन मिळते. त्यांना यापुढे सुमारे 8 लाख रूपये इतके वेतन मिळणार असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. ते वृत्त पाकिस्तानात मोठ्या चर्चेचा विषय ठरून इम्रान टीकेचे धनी बनले. त्याचे कारण म्हणजे, मोठ्या संकटात सापडलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था. देश मोठ्या आर्थिक अडचणीत असताना इम्रान यांची कथित वेतनवाढ संतापाचा विषय ठरली. त्यामुळे वेतनवाढीचे वृत्त खोटे असल्याचे सांगण्यासाठी पाकिस्तान सरकारला धावाधाव करावी लागत आहे. सरकारी खर्चात कपात करण्यासाठी स्वत: इम्रान यांनी मोहीम हाती घेतली आहे. अशात त्यांच्याच वेतनवाढीचे वृत्त निराधार आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी स्वत: इम्रान यांनी त्यांना मिळणारे वेतन अतिशय अल्प असल्याची व्यथा मांडली होती. पंतप्रधान निवासस्थानाचा खर्च आम्ही 40 टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. मी स्वमालकीच्या घरात राहतो. माझ्या खर्चाचा भार मी स्वत:हूनच उचलतो. माझा घरगुती खर्च भागवण्याइकतेही सरकारी वेतन मला मिळत नाही, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय खालावल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या देशाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी इतर देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना साकडे घालत फिरावे लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.