पेशावर : इम्रान खान यांना अटक झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीटीआय पक्षाने खैबर पख्तुनख्वा प्रांतात विराट निषेध मोर्चाचे आयोजन आज केले होते. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. इम्रान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी या महिन्याच्या अखेरीला राजधानी इस्लामाबादेत देखील असाच विराट मोर्चा काढला जाणार आहे.
पीटीआयचा मोर्चा खैबर पख्तुनख्वातल्या पंजाब प्रांताला लागून असलेल्या स्वाबी जिल्ह्यात काढण्यात आला. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर, पक्षाचे अध्यक्ष गोहर अली खान आणि महासचिव उमर अयुब यांनी यावेळी पीटीआयच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. इम्रान खान यांना गेल्या वर्षी ५ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आणि अटक येथील तुरुंगात नेण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची रवानगी पेशावर शहरातल्या अदियाला तुरुंगात करण्यात आली.
त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार,तोशखाना नियमांचे उल्लंघन, ९ मे रोजीच्या दंगलीचे प्रकरण, गैर इस्लमी पद्धतीने विवाह आणि अशा सुमारे २०० प्रकरणी खटले सुरू आहेत. त्यातील काही प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. तर काही प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना आणि पत्नी बुशरा बिबी यांनाही वेगवेगळ्या प्रकरणात अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे.