इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याच देशाची नाचक्की करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आता पाकिस्तानमध्ये बंडाचे वारे वाहताना दिसत आहे. कारण पाकमधील विरोधी पक्षांनी खान यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतू, विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी केला आहे.
इम्रान खान यांना पदावरून पायउतार करण्यासाठी पुढील आठवडयात विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, मात्र त्यामुळे भारतात आनंदाची लाट पसरली असल्याचे खान यांनी म्हटले आहे. जमात-उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय-एफ) नेते फझलूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली 31 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये आझादी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याला पाकिस्तान मुस्लीम लीग-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
पाकिस्तानमध्ये जुलै 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या विजयासाठी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप फझलूर यांनी केला असून इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फझलूर यांच्या आंदोलनामागे विशिष्ट हेतूने प्रेरित कारस्थान आहे, असे मत इम्रान खान यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषकांच्या बैठकीत व्यक्त केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आपण राजीनामा देणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.