मोदींना पंतप्रधान करा, सांगणारे इम्रान खान कोण? – प्रकाश आंबेडकर

भाजपने साध्वीला उमेदवारी देऊन शहीदांचा अपमान केला

सांगली – नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्‍मीरचा प्रश्‍न सुटेल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने केले होते. मोदींना पंतप्रधान करा, असे सांगणारे इम्रान खान कोण? मोदी, शाह इम्रान खानच्या या वक्‍तव्यावर का बोलत नाहीत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या “भेटीगाठी’ आम्ही बाहेर काढू असा इशाराही दिला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीत सभा झाली. यावेळी आंबडेकर बोलत होते. मालेगाव बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन भाजपने शहीदांचा अपमान केला आहे. लोकशाहीविषयी घृणा निर्माण केली आहे, अशी घणाघाती टीका देखील आंबेडकर यांनी यावेळी केली. “आरएसएस’ ही दहशतवादी संघटना आहे. या संघटनेला हत्यारे कशासाठी पाहिजेत. आर्मीकडे असणारी सर्व हत्यारे “आरएसएस’कडे कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीला विरोधकांकडून भाजपची “बी’ टीम म्हटले जात आहे. पण ही वंचित आघाडी “ए’ टीम आहे. प्रस्थापित आता विस्थापित होणार आहेत. वंचित बहुजन सत्तेत येणार आहेत, असेही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले. मात्र, भाजपने जिल्ह्याचा अवमानच केला. त्यामुळे भाजपला आता जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपचे उमेदवार संजय पाटील, स्वाभिमानी-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी कारखाने मोडीत काढले आहेत. संजय पाटील आणि विशाल पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.