श्रीलंकेच्या संसदेतील इम्रान खान यांचे भाषण रद्द

इम्रान खान यांच्याकडून भाषणात काश्‍मीर प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्‍यता

कोलोंबो – श्रीलंकेने पुढच्या आठवड्यातील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे श्रीलंकेच्या संसदेतील नियोजित भाषण रद्द केले आहे. इम्रान खान यांच्याकडून जम्मू काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला जाण्याच्या शक्‍यतेने श्रीलंकेने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी कोविड-19 संबंधित प्रतिबंधांचे कारण असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात इम्रान खान यांच्याकडून भाषणात काश्‍मीर प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्‍यता आणि त्याच्या परिणामांबाबत झालेल्या चर्चेनंतर श्रीलंकेच्या सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

इम्रान खान 22 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेला येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संसदेला संबोधित करतील, असे श्रीलंकेचे सभापती महिंदा अबेवर्डेना यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांगितले होते. हे भाषण 24 फेब्रुवारी रोजी होणार होते आणि या भेटीदरम्यान अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवर्डेना यांची इम्रान खान भेट घेणार आहेत.

इम्रान खान यांच्या भाषणाबद्दल आगोदर सविस्तर विचार झालेला नव्हता. त्याबाबत सरकारमध्ये बरीच चर्चा झाली. त्यात पंतप्रधान खान यांनी काश्‍मीर प्रश्नाचा संदर्भ घेण्याची शक्‍यता उद्भवली. अशा धोक्‍याची जाणीव झाल्यावर इम्रान खान यांनी श्रीलंकेच्या संसदेला संबोधित न करणे अधिक शहाणपणाचे असल्याचा निर्णय झाला.

काश्‍मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करण्याचे पाकिस्तान सरकारचे नेहमीचे धोरण आहे. विशेषतः भारताने ऑगस्ट 2019 मध्ये काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर कोविड संदर्भात चर्चा करण्यासाठी भारताने बोलावलेल्या सार्क नेत्यांच्या आभासी बैठकीतही पाकिस्ताननेही काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.