पाकिस्तानच्या सत्तेकडे इम्रान खान यांचे कूच

झरदारी ठरणार किंगमेकर?

इस्लामाबाद -पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान हे त्यांच्या देशाचे सत्ताधीश बनण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या पक्षाने पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे. अर्थात, त्या देशात त्रिशंकू संसद अस्तित्वात येण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी किंगमेकर ठरतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानमध्ये बुधवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदान पूर्ण होताच मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या प्रारंभीच्या फेरीत इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने 94 संसदीय जागांवर आघाडी घेतली. तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्ष 53 जागांवरील आघाडीसह दुसऱ्या स्थानी आहे. तर झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) तिसऱ्या स्थानी फेकली गेली आहे. पीपीपीचे उमेदवार 32 जागांवर आघाडीवर आहेत. अपक्षांनी 20 जागांवर आघाडी घेतली आहे. या जागा पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीच्या आहेत.

नॅशनल असेंब्लीचे एकूण संख्याबळ 342 आहेत. त्यातील 272 जागा जनतेमधून निवडून दिल्या जातात. तर उर्वरित 70 जागा महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. त्या नंतर राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या प्रमाणानुसार भरल्या जातात. प्राथमिक मतमोजणीत 230 जागांचे कल समोर आले आहेत.

पाकिस्तानच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. याशिवाय, दहशतवादी संघटनांच्या सहभागामुळेही ही निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतर होणार आहे. त्या देशाला आता इम्रान यांच्या रूपाने नवा सत्ताधीश मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)