इस्लामाबाद – चीनच्या पूर्ण कह्यात गेलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी त्या देशावर स्तुतिसुमनांचा शब्दश: वर्षाव केला. गरिबी उच्चाटनासाठी चीन हा विकसनशील देशांसाठी एक रोल मॉडेल असल्याचे त्यांनी म्हटले.
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इम्रान यांनी व्हर्च्युअल सहभाग नोंदवला. त्यामध्ये बोलताना त्यांनी चीनची आणि त्या देशाचे अध्यक्ष शी जीनपिंग यांची तोंडभरून प्रशंसा केली. चीनने मागील चार दशकांत प्रचंड आर्थिक विकास केला.
त्यामुळे त्या देशातील 80 कोटी नागरिक गरिबीतून मुक्त झाले. हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी चीनने स्वीकारलेली नेतृत्वाची भूमिका उल्लेखनीय आहे. समृद्ध, स्वच्छ आणि सुंदर जगासाठीचा जीनपिंग यांचा दृष्टीकोनही मोलाचा आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडल्यानंतर पाकिस्तानने चीनच्या रूपाने नवा आधार शोधला. आता चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री अधिकाधिक घट्ट होत आहे. ती बाब प्रामुख्याने भारताची डोकेदुखी वाढवणारी आहे. अनेक बाबतींत दुबळ्या असणाऱ्या पाकिस्तानला चीनकडून विविध प्रकारची मदत केली जात आहे. त्यातून पाकिस्तानचे उच्चपदस्थ सातत्याने चीनची स्तुती करण्यात मग्न दिसतात.