इस्लामाबाद : इम्रान खान आणि त्यांच्यापत्नी बुशरा बिबी यांना पाकिस्तानातील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या नवीन खटल्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी संश्थेच्या कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनाही 8 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. इस्लामाबादेतल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खान आणि बुशरा बिबी यांना बेकायदेशीर विवाह खटल्यातून निर्दोष मुक्त केले होते.
गैर इस्लामी रितीने निकाह केल्याबद्दल कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली ७ वर्षांची शिक्षाही न्यायालयाने रद्द केली होती. इतर कोणत्याही प्रकरणात कोठडी आवश्यक नसेल, तर या दोघांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र त्यानंतर लगेचच राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेने या दोघांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक केली आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यातआली आणि आज न्यायालयापुढे त्यांना हजर करण्यात आले. अदियाला तुरुंगातच झालेल्या या सुनावणी दरम्यान न्यायालयाने या दोघांनाही 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.
राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेच्या ताब्यातील कोठडीची मुदत ४० दिवसांपर्यंत वाढवली जाऊ शकते. इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी नियम डावलून सरकारी भांडारातून भेटवस्तूंची खरेदी केली होती, असा या दाम्पत्यावर आरोप आहे. इम्रान खान आणि बुशरा बिबी यांच्यावर तोशखाना भ्रष्टाचाराचे हे तिसरे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांना यापूर्वीच्या दोन खटल्यांमध्ये सुनावण्यात आलेली शिक्षा इस्लामाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.