इम्रान खान लष्कराचे बाहुले -रेहम खान

नवी दिल्ली – पाकिस्तानी लष्कराच्या हातचे बाहुले असलेले पंतप्रधान इम्रान खान हे पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत निवेदन देण्यासाठी लष्कराच्या आदेशाची वाट पाहत होते, असे खळबळजनक वक्तव्य रेहम खान यांनी केले आहे. इम्रान खान पुलवामाचा विषय टाळत नव्हते, तर लष्कराच्या सूचनांची वाट पाहत होते, इम्रान खान जे आणि जेवढे लष्कराने सांगितले आहे, तेवढेच बोलतात, असे उदगार रेहम खान यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत काढले आहेत.

त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आपले निवेदन लष्कराच्या सूचनेनुसार केल्याचे आणि हल्ल्यानंतर पाच दिवसांनी आलेले त्यांचे तोलूनमापून निवेदन हे फारच उशिरा आल्याचे रेहम खान यांनी म्हटले आहे. रेहम खान या इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी असून ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखिका आहेत.

असा मोठा दहशतवादी हल्ला, मग तो भारतात असो वा कोठेही असो, झाल्यानंतर त्याचा निषेध करणारी प्रतिक्रिया ताबडतोब येणे आवश्‍यक होते, असे रेहम खान यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाच दिवसांनी आलेल्या इम्रान खान यांच्या निवेदनावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सडकून टीका केलीे आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान आज जैश-ए-मोहम्मदची भाषा बोलत होते ही मोठी खेदाची आणि शरमेची बाब असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.