काश्‍मीर प्रश्‍नावर पुरेसा पाठिंबा न मिळाल्याची इम्रान यांची पुन्हा कबुली

वॉशिंग्टन  – काश्‍मीरच्या प्रश्‍नावर भारताच्या विरोधात आम्हाला ज्या प्रमाणात जागतिक समुदायाचा पाठिंबा अपेक्षित होता तसा तो मिळत नसल्याची खंत पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले की काश्‍मीरातील स्थितीची आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घ्यावीच लागेल. पंतप्रधान मोदींनी काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याचा विषयच उपस्थित होत नाही. काश्‍मीरच्या विषयावर त्यांनी जी काही वर्तणूक केली आहे ती पहाता त्यांच्याशी चर्चा करण्यात आम्हाला स्वारस्य उरलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विषयावर तुम्हाला अपेक्षित पाठिंबा न मिळण्याची कारणे काय असावीत असे विचारता ते म्हणाले की भारत हे एक मोठे मार्केट आहे. एक अब्ज लोकांची ही तयार बाजारपेठ गमावणे जगातल्या अनेक देशांना परडणारे नसल्याने त्यांनी गप्प बसणेच पसंत केले असावे अशी टिपण्णीही त्यांनी केली.

अनेक जागतिक नेत्यांना काश्‍मीर विषयाचे गांभीर्य पुरेसे समजलेच नसावे आणि ज्यांना हे समजले त्यांनी भारताची बाजारपेठ पाहून गप्प बसणे पसंत केले असावे ही दु:खाची बाब आहे असेहीं ते म्हणाले. आपल्या न्युयॉर्कच्या दौऱ्यात आपण अनेक राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांना काश्‍मीर विषयक घडामोडींची आणि तेथील मानवाधिकाराच्या उल्लंघनाची सविस्तर माहिती दिली आहे असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.