नगर – वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण घेऊन अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर करत समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जिद्द डॉ. संदीप गाडे यांनी बाळगली. याच जिद्दीतून उभे राहिलेले इंपल्स हॉस्पिटल केवळ हृदयरोगाच नव्हे; तर सर्व प्रकारच्या व्याधीं वरील उपचारांसाठी “आरोग्य संजीवनी’ ठरेल, असा विश्वास आदर्श हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार (पद्मश्री प्राप्त) यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक आरोग्य सेवांनी सुसज्ज असलेल्या येथील इंपल्स हॉस्पिटलचा शुभारंभ रविवारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पोपटराव पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कॅथलॅब, 22 बॅडसचा अतिदक्षता विभाग पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी आणि सिटीस्कॅन विभागाचा शुभारंभ नगर विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नामदार शंकरराव गडाख, खा. डॉ. सुजय विखे, आ.अरुण जगताप, आ. निलेश लंके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी मंत्री आ. सुरेश धस, आष्टीचे आ. बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आय.एम. ए. चे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, नोबल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धस म्हणाले, डॉ. संदीप यांनी खेड्यातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आणि तळागाळातील लोकांची सेवा करण्यासाठी ते नगरला रुजू झाले. भविष्यातही त्यांच्या हातून इंपल्सच्या माध्यमातून अशीच सर्वोत्तम आरोग्यसेवा घडो आणि गरिबातल्या गरीब रुग्णाला देखील आरोग्याचे वरदान त्यांच्या हस्ते लाभो.’
ना. तनपुरे यांनी हॉस्पिटलची पाहणी करून उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर गाडे यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले “शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्याविषयी आता मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. लोकांसाठी सर्वोत्तम रुग्णालये निर्माण होणे ही आता काळाची गरज झालेली आहे. ती ओळखून डॉक्टर गाडे यांनी या इंपल्स हॉस्पिटलची उभारणी केली.
‘आपण अनेक मोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटलला भेटी दिल्या, त्या वेळी त्या ठिकाणी उपलब्ध असलेली सुविधा आज इंपल्स हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध असल्याचे पाहून खूप समाधान वाटले.
रुग्णांसाठी इंपल्स हॉस्पिटल हे ‘आरोग्य मंदिर’ ठरेल याची आपणास खात्री असल्याचे गडाख यांनी सांगितले. आ.जगताप म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून डॉ. संदीप गाडे यांनी आपल्या उपचार पद्धतीतून नगरकरांचा विश्वास संपादन केलेला आहे. याच विश्वासाच्या बळावर आज इंपल्स हॉस्पिटल उभं राहिले.