नवी दिल्ली – अमेरिकेमध्ये मंदी निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. यामुळे बरेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहे. परिणामी गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये बरीच गुंतवणूक वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये शुक्रवारीही सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 255 रुपयांनी वाढून 51, 783 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,610 रुपयांनी वाढून 56,387 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,762 डॉलर व चांदीचा दर 20.10 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
या संदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज ज्या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पाटील यांनी सांगितले की, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेचा विकासदर नकारात्मक पातळीवर होता. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी काल जाहीर झाली. त्यामध्ये अमेरिकेचा विकासदर पुन्हा नकारात्मक पातळीवर आला आहे. सलग दोन तिमाहीमध्ये हा विकासदर शुन्य टक्क्याच्या खाली असल्यानंतर तांत्रिकदृष्टया त्या देशांमध्ये मंदी असल्याचे समजले जाते.
त्यामुळे अमेरिका आगामी काळात व्याजदर वाढ करणार नाही आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करील असे समजले जाते. परिणामी डॉलरपेक्षा अधिक सुरक्षित गुंतवणुकीकडे आता जागतिक गुंतवणूकदार वळू लागले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर सोने आणि चांदीची खरेदी वाढली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी मंदीची शक्यता नाकारली असली तरी एकूण आकडेवारी अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता सूचित करीत आहे. बऱ्याच पत विश्लेषक संस्थांनी अमेरिकेमध्ये कमी प्रमाणात का होईना पण काही काळ मंदी मुक्काम करणार असल्याचे सांगितले आहे.