पिंपरी : पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय जादा होते. गेल्या दोन महिन्यांच्या क्राइम बैठकीत आयुक्तांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत पोलीस निरीक्षकांना याबाबत तंबी दिली होती. मात्र यावेळी झालेल्या आढावा बैठकीत प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.
दर महिन्याला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई क्राइम मीटिग घेतात. या बैठकीत महिनाभराचा आढावा घेतात. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत बहुतांश गुन्ह्यांचा तपास प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. हे प्रमाण कमी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
मात्र तरीही महिनाभरात यामध्ये विशेष बदल झाले नाहीत. यामुळे त्यानंतरच्या बैठकीत आयुक्तांनी पोलीस निरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांचे कान टोचले. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत पाठपुरावा करीत प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी केले. यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही.
दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे आपल्या परिसरात याबाबतचे पडसाद उमटणार नाहीत, याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. यापूर्वी शहरात झालेल्या दंगलीमधील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा आरोपींच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.