रिऍल्टी क्षेत्रासाठी आशादायक चित्र
पुणे – निवासी क्षेत्रातील बांधकामातील मरगळ आणि इतर कारणांमुळे डिसेंबरपर्यंत सिमेंटच्या दरामध्ये फारशी वाढ झाली नव्हती. मात्र, जानेवारीमध्ये सिमेंटच्या दरामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळ रिऍल्टी क्षेत्रासाठी आशादायक राहण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारतातील बहुतांश भागांमध्ये सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरामध्ये प्रतिबॅग दहा रुपयांची म्हणजे जवळपास 3 टक्क्यांची वाढ केली आहे. एका बॅगमध्ये 50 किलो सिमेंट असते. मागणी नसल्यामुळे या अगोदरच्या सहा महिन्यांमध्ये सिमेंटच्या किमती प्रति बॅगेला 30 रुपयांनी कमी झाल्या होत्या. साधारणपणे वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये सिमेंटला चांगली मागणी असते.
गेल्या पंचवीस वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले आहे, की कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये सिमेंटच्या किंमती साधारणपणे 7 टक्क्यांनी वाढल्या, तर दुसऱ्या त्या सहामाहीत 2 टक्क्यांनी कमी झाल्या. कारण, दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये पावसाळा आणि बरेच सण येत असल्यामुळे बांधकाम कमी प्रमाणात केले जाते.
नोव्हेंबरमध्ये सिमेंटच्या विक्रीतही चार टक्के वाढ झालेली आहे. त्या अगोदरच्या अनेक महिन्यांमध्ये यामध्ये फारशी वाढ झालेली नव्हती. यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, तूट कमी करण्यासाठी सरकार आपला बांधकामावरील खर्च कमी करण्याची शक्यता आहे. या आणि इतर कारणांमुळे चालू आर्थिक वर्षात तरी मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील वर्षी ती निश्चितपणे वाढेल.
इतर भागात कमी-अधिक प्रमाणात मागणी वाढली तरी दक्षिण आणि पूर्व भागामध्ये मागणी फारशी वाढत नाही. त्याचा एकूण सिमेंट उद्योगावर परिणाम होत असतो. मात्र त्यातल्या त्यात सिमेंट कंपन्यांच्या दृष्टिकोनातून जमेची बाब म्हणजे पेट कोकच्या किमती वाढलेल्या नाहीत. त्यामुळे सिमेंट कंपन्यांचा नफा कमी होणार नाही. त्यामुळे डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीतच्या ताळेबंदामध्ये सिमेंट कंपनीच्या नफ्यावर जास्त दबाव येणार नसल्याचे समजले जाते.