पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सुधारित विकास आराखडा होणार आहे. सुधारित विकास आराखडात दुसऱ्यांदा तयार करण्यात येत असून हा आराखडा एकत्रित होणार असून प्राधिकरणाने त्यासाठी आवश्यक इरादा घोषित करण्यास मंजूरी दिली आहे. तर, महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव आयत्या वेळी मंजुरीसाठी ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
विकास आराखडा सुधारित करण्यासाठी गाव नकाशे आणि सिटी सर्व्हे शीटचा अभ्यास करून सध्या नकाशा (बेस मॅप) तयार करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 20 वर्षांतील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन महापालिका आणि प्राधिकरण अशा दोन्ही संस्थांचा विकास आराखडा दुसऱ्यांदा सुधारित केला जात आहे. शहरातील जमिनीचा सध्या होत असलेला वापर तपासण्यासाठी घरोघरी जाऊन बांधकामांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच, रस्त्यांचा सध्याचा वापरही तपासला जाईल. त्यासाठी उपग्रहाद्वारे काढलेले छायाचित्र आणि प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती अशी तुलना केली जाणार आहे.
शहराचे सध्या एकूण क्षेत्र 177 चौरस किलोमीटर इतके आहे. महापालिका हद्दीत हिंजवडीसह सात गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा देखील सुधारित विकास आराखड्यात समावेश केला जाणार आहे.
आराखडा सुधारित करताना प्रामुख्याने विकासकामांची विविध आरक्षणे टाकण्यात येतील. त्याचे योग्य नियोजन करून या आराखड्याचे काम पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी घेऊन हा आराखडा लागू केला जाणार आहे. तत्पूर्वी, त्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जातील. तसेच, सर्वसाधारण सभेची त्यासाठी मान्यता घेण्यात येणार आहे.
“”महापालिका व प्राधिकरणाचा विकास आराखडा दुसऱ्यांदा सुधारित केला जात आहे. हा आराखडा एकत्रित केला जाणार आहे. विकासकामांचे नियोजन, आवश्यक आरक्षणे, आराखडा मंजुरी आणि प्रत्यक्ष आराखडा लागू करणे आदी कार्यवाही तीन वर्षांत पूर्ण केली जाईल.”
– रा. म. पवार, उपसंचालक, नगररचना, महापालिका