येत्या जूनपर्यंत अल्पमुदतीमधील कामे पूर्ण करण्यात येणार
प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्त्वाचे धरण असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे या प्रकल्पासाठी शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. या दुरुस्तीच्या कामास सुधारित मान्यता मिळाल्यास येत्या जूनपर्यंत अल्पमुदतीमधील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
टेमघर धरणाची क्षमता चार टीएमसी आहे. हे धरण पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि मुळशी तालुक्यातील 1 हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चार धरणांपैकी टेमघर धरण हे महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन 2017 पासून गळती प्रतिबंधक कामांना सुरुवात झाली असून धरणाची 90 टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे.
यंदा पावसाळ्यात हे धरण दोनवेळा भरून वाहिले होते. तसेच या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची गळती प्रतिबंधक कामे सुरू करता आली नव्हती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात सुरुवात झाली आहे.
…तोवर धरण पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत टेमघर धरणाचा विषय आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या दुरुस्तीच्या कामात काही अडचणी आहेत किंवा कसे, असे विचारल्यानंतर उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास अल्पकालावधीतील दुरुस्तीची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण होतील. मात्र, दीर्घकालीन उपाययोजना होत नाहीत, तोवर धरण पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही, असा अभिप्राय केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ समितीने दिला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर सुधारित मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.