“प्रोत्साहन भत्त्याऐवजी स्थिती सुधारा’

तीन मार्गांवर प्रयोग : पीएमपी प्रशासनाच्या उपक्रमांवर कर्मचाऱ्यांची नाराजी
– विष्णू सानप
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने उद्दिष्टापेक्षा जादा उत्पन्न मिळविणाऱ्या “पीएमपी’ चालक-वाहकांना दहा टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रयोग पुण्यातील तीन मार्गावर राबविण्यात येत आहे. परंतु या उपक्रमावर कर्मचारीच नाराजी व्यक्‍त करत असून प्रोत्साहन भत्त्याऐवजी बसची परिस्थिती सुधारा, असा सल्ला चालक-वाहकांकडून देण्यात येत आहे. अशा योजना आणून कर्मचारी काम करत नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय की काय? असा प्रश्‍न देखील उपस्थित केला जात आहे. कर्मचारीच काम करीत नाहीत. त्यांनी जर, चांगले काम केले तर, पीएमपीची स्थिती सुधारेल व उत्पन्न वाढेल असा कयास लावला जात आहे. मात्र, पीएमपी प्रशासन रस्त्यावर धावत असलेल्या बसच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नाहीत, असे स्पष्ट मत कर्मचाऱ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केले. तसेच बसच्या अवस्थेची व्यथा ही मांडली.

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात सार्वजनिक वाहतुकीची धुरा सांभाळण्याचे काम पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)करते. मात्र, दिवसेंदिवस पीएमपीची वाहतूक सेवा मोडकळीस येत आहे. त्यावर नव्याने ई-बसेस व सीएनजी बसेस ताफ्यात सामील करुन मलमपट्टी करण्यात येत आहे. पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 56 बसेस आहेत. त्यातील 649 बसेस या भाडेतत्वावरील तर, 1407 बसेस “पीएमपी’च्या मालकीच्या आहेत. मात्र, जुन्या बसपैकी सुमारे 70 टक्केच बसेस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. “पीएमपी’च्या ताफ्यात आता नव्याने 96 ई-बसची भर पडली आहे.

कर्मचाऱ्यांनी सांगितले की, नव्या आलेल्या ई-बसेस व सीएनजी बसमुळे पीएमपीच्या उत्पन्नात भर पडत आहे. मात्र, अजूनही रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या व नादुरुस्त बस कधीही कुठेही बंद पडतात. यामुळे प्रवासी “पीएमपी’ने प्रवास टाळत आहेत. याकडे पीएमपी प्रशासनाने लक्ष न देता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची सक्‍ती करुन त्याच्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तर प्रोत्साहन भत्ता सुरु करुन “पीएमपी’ कर्मचाऱ्यांच्या कामावर शंका उपस्थित केली आहे.
एका वर्षात 4737 “ब्रेकडाऊन’
गेल्यावर्षी एप्रिल 2018 ते मार्च 2019 पर्यंत पीएमपीच्या मालकीच्या 2 हजार 46 बसेस तर, भाडेतत्वावरील 2 हजार 691 अशा एकूण 4 हजार 737 बस “ब्रेक डाऊन’ होऊन रस्त्यात बंद पडल्या होत्या. त्यात आजही फार काही बदल झाला नसल्याचे चित्र आहे. यावर प्रयोग म्हणून ब्रोकन पद्धत, प्रोत्साहन भत्ता असे प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र, पीएमपी प्रशासनाचे अधिकारी योग्य नियोजन आणि बसेसची स्थिती सुधारणार नाहीत तोपर्यंत “पीएमपी’ला “अच्छे दिन’ येणार नाहीत.

जनसंपर्क अधिकारी सदैव बैठकांमध्येच
“पीएमपी’च्या परिस्थितीबद्दल अधिकृत माहिती देण्यासाठी पीएमपीने जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे; परंतु त्यांच्याशी कुठल्याही वेळी आणि कितीही वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरी ते आपण बैठकीत असल्याचे सांगतात. यामुळे पीएमपी प्रशासन जाणून-बुजून माहिती लपविते की काय? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)