नादुरुस्त ट्रक ठरतोय वाहतुकीला अडथळा

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष


गोंदवले हे तीर्थक्षेत्र असून येथून दहिवडी पोलीस ठाणे फक्त पाच ते सहा किमी अंतरावर आहे. या रस्त्याने दहिवडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकदाही प्रवास केला नसेल का? असा प्रश्‍न सामान्य नागरिक विचारत आहेत म्हणजे गोंदवले बुद्रुक गावाच्या वाहतुकीवर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे असेच दिसत आहे.

गोंदवले – गोंदवले बुद्रुक येथील दहिवडी रोडवर गेले दहा दिवस एक माल ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद अवस्थेत उभा आहे. या ट्रकमुळे इतर वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. येत्या दोन दिवसात राखी पौर्णिमा असून गोंदवलेमध्ये मोठी गर्दी होते हे लक्षात घेऊन दहिवडी पोलिसांनी हा ट्रक त्वरित बाजूला काढावा अशी मागणी होत आहे.

गोंदवले बुद्रुक या तीर्थक्षेत्र ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर असून यानिमित्त येथे दररोज भाविकांची गर्दी असते. या समाधी मंदिराकडे यायला पिंगळी आणि दहिवडी असे दोन मुख्य रस्ते आहेत. दोन्ही रस्त्याने मंदिराकडे येताना वाहनचालकांना खूप कसरत करावी लागत असते. सध्या गेले दहा दिवस झाले दहिवडी रस्त्यावर मोधळ ओढ्याच्या तीव्र चढाच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक मालाने पूर्ण पणे भरलेला ट्रक बंद अवस्थेत उभा आहे.

या रस्त्याने दहिवडी फलटण बारामती या शहरांकडे जाणारे माल ट्रक या ठिकाणा वरून जात असतात त्याच बरोबर थोडं पुढं गेलं की आश्रम शाळा असून दहिवडीमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या स्कुल बस, रिक्षा, एसटी आराम बस याच रस्त्याने प्रवास करतात तर रात्री याठिकाणी असणाऱ्या अंधारात रस्त्याच्या मधोमध असणारा हा ट्रक अजिबात दिसत नाही. मुख्य डांबरी रस्त्यानंतर कच्या मातीचा निसरडा रस्ता आहे. बंद ट्रकच्या बाजूला इतर वाहनांना समजावे म्हणून कोणत्याही साधनांचा वापर केला नसल्याने धोका निर्माण झाला आहे. पौर्णिमेला गोंदवलेमध्ये दर्शनाला उच्चांकी गर्दी असते, त्यामुळे रस्त्यात असणारा हा अडथळा पोलिसांनी लक्ष घालून लवकर हटवणे गरजेचे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.