बॅंकांकडून फक्‍त किरकोळ कर्जावर भर अयोग्य

मुंबई – सध्याच्या परिस्थितीत सावधगिरीचा उपाय म्हणून बॅंका रिटेल म्हणजे किरकोळ कर्जावर भर देत आहेत. मात्र एकूणच अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे बॅंकांनी केवळ रिटेल कर्जावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. यासाठी बॅंकांनी इतर कर्ज वितरित करण्याचा प्रयत्न करावा, असे स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अर्जित बसू यांनी म्हटले आहे.

या विषयावरील परिसंवादात बोलताना बसू म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत कंपन्यांची परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे बॅंका आपली उलाढाल कायम ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात किरकोळ कर्ज वितरणाकडे लक्ष देत आहेत. मात्र, पहिल्या तिमाहीत विकासदर उणे 23.9 टक्‍के झाला आहे. याचा अर्थ आगामी काळात रिटेल कर्जावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे आपले व्यवहार कायम ठेवण्यासाठी बॅंकांना इतर कर्ज देण्याच्या शक्‍यतेवर काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कर्ज वितरण आणि वसुलीवर परिणाम झाला होता. आता परिस्थिती सुधारेल असे वाटत असतानाच लॉकडाऊन निर्माण झाले. यामुळे कर्ज देणाऱ्या बॅंकांची परिस्थिती अधिक बिघडली होती.. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने कर्जाचा हप्ता न देण्याची सवलत आणि कर्ज फेररचनेचा प्रस्ताव पुढे केल्यामुळे बॅंकांच्या ताळेबंदावरील दबाव तुलनेने कमी होण्यास मदत झाली असल्याचे त्यानी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.