मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किंवा कोणता नेता देशासाठी महत्त्वाचा आहे, त्यांना सरकारने सुरक्षा पुरवणं आवश्यक आहे. सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेण अयोग्य आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसतानाही त्यांना सुरक्षा देण्यात आल्याचे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान रोहित पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे रहित पवार म्हणाले.