कोल्हापूरात खासगी सावकारांच्या घरावर छापे

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूरमधील 10 पेक्षा अधिक खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी सकाळी सहकार विभागाने पोलीस बंदोबस्तात छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून सावकारांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तीन दिवस सावकारांवरील कारवाई सुरू राहणार असल्याची चर्चा आहे.
शहरातील राजारामपुरी बारावी गल्ली आणि उद्यमनगरातील खाजगी सावकारांच्या घरी, कार्यालयावर छापे टाकले. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये बँक पासबुक, कराराची कागदपत्रे, संपत्तीचे दस्त अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. त्याशिवाय कोरे स्टँपेपर आणि सह्या केलेले चेक मिळाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, खासगी सावकारांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली तरी सहकार खात्याकडून कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत होते. सावकारीखाली दबलेल्या नागरिकांनी पोलीस, सहकार विभागासह राज्य सरकारकडे तक्रारी केल्यानंतर आज कारवाई करण्यात आली.
सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जिल्हा निबंधक कार्यालयाजवळ १००हून अधिक पोलिस जमा झाले होते. सावकार घरातून बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांच्या सरंक्षणाखाली सहकार खात्याने सावकारांच्या घरावर छापे टाकले. दरम्यान खाजगी सावकारांची नावे आणि त्याची मालमतेची माहिती देण्यास सहकार विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.