नवी दिल्ली “चार्टर्ड अकाउंटंट‘च्या आगामी परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्याचे “इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया‘ ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, असे काही उमेदवारांनी सुचवले होते. मात्र या परीक्षेतून उमेदवारांच्या विश्लेषण कौशल्याची पडताळणी होत असते. ही परीक्षा तपशीलात उत्तरे देण्याची असते. त्यामध्ये केवळ पर्याय निवडण्याची पद्धत नसते. असे असल्याने ही परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्याचे “आयसीएआय‘ने सर्वोच्च न्यायालयास सांगितले.
“आयसीएआय‘कडे परीक्षा केंद्र म्हणून वेगळा कक्ष नाही आणि डॉक्टरांची सुविधाही नाही, असे वरिष्ठ वकील रामजी श्रीनिवासन यांनी सुनावणी दरम्यान “आयसीएआय‘तर्फे बाजू मांडताना सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडलेल्या सर्व सूचनांचा विचार करण्यात आला. मात्र ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड –19 बाबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचलेल्या पावलांबाबत “आयसीएआय‘च्या वेबसाइटवर माहिती प्रकाशित करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने “आयसीएआय‘ला दिले आणि ऑनलाइन परीक्षेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.