क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून संकेत, आयपीएलची शक्यता वाढली
मेलबर्न -टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आयसीसीने जरी जुलैचा मुहूर्त ठरवला असला तरी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने मात्र या स्पर्धेचे आयोजन अशक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाच्या आशा वाढल्या आहेत.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत आहे. 18 ऑक्टोबरला सलामीचा सामना असून त्यापूर्वी सर्व संघांना येथे दाखल व्हावे लागणार आहे. केवळ दाखलच नव्हे तर स्पर्धेपूर्वी 15 दिवस यावे लागेल व 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. हाच मोठा प्रश्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला सतावत आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 16 संघांना विलगीकरणात ठेवणे व स्पर्धेचे नियोजन, प्रायोजकांच्या अटी हे सर्व पाहता त्यांना मोठी आर्थिक क्षमताही सिद्ध ठेवावी लागेल. करोनाचा धोका वाढू लागल्याने देशात 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला असल्याने हवाई प्रवासावरही निर्बंध आहेत.
18 ऑक्टोबरला स्पर्धा सुरू करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार सरकारला करावा लागणार आहे. त्यानंतरच आयसीसीला निर्णय घ्यावा लागेल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मंडळ या
स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक नसल्याचेच दिसून येत आहे. या स्थितीत आयसीसी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या मतावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टी-20 विश्वकरंडक होणार का नाही, याबाबत मंडळाने स्पष्ट केलेले नसले तरीही त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात 4 कसोटी, 3 एकदिवसीय व 2 टी-20 सामने खेळण्यासाठी येत आहे. करोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने त्यांना जवळपास 2 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आता भारताने दौरा केला तरच हे नुकसान काही प्रमाणात भरून निघणार आहे.
आयपीएलची शक्यता वाढली….
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिलेले संकेत बीसीसीआयसाठी लाभदायक ठरणार आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जर पुढे गेली किंवा रद्द झाली तर त्या विंडोमध्ये आयपीएलचे आयोजन करणे शक्य होणार आहे. आयपीएल स्पर्धा येत्या 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. मात्र, पुढील महिन्यात आयसीसीच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ काय स्पष्टीकरण देते यावर या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या रॉबर्ट्स यांची गच्छंती
करोनाचा धोका वाढल्यानंतर मंडळातील 80 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यावर टीकेचे धनी बनलेल्या मंडळाचे कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिला आहे. अर्थात, हा राजीनामा त्यांच्याकडून घेतला गेल्याचे वर्तवण्यात येत आहे.