मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या अनेक दिवसांपासून पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर मानेचा त्रास सुरू झाल्याने त्यांना काल रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट समोर आले असून उद्या सकाळी 7 ते 8 दरम्यान त्यांच्यावर शस्रक्रिया होणार आहे. जेष्ठ आर्थो सर्जन डाॅक्टर शेखर भोजराज हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मानेच्या त्रासामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी (10 नोव्हेंबर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झाले. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आहे. त्यानुसार उद्या सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.