1) वारंवार तहान-भूक लागणे
जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल, भूक लागत असेल तसेच वारंवार लघवीला जावे लागत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही जणांच्या जखमा भरून येण्यास खूप वेळ लागतो. अशी लक्षणे आपल्यात आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडून शरीराची तपासणी करून घ्या. ही लक्षणे मधुमेहाची असू शकतात. रक्ताची चाचणी केल्यावर आपल्याला मधुमेह आहे की नाही, हे कळू शकते.
2) छातीत आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे
छातीत वारंवार दुखत असेल किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे हृदय रोगाची असू शकतात. काही जणांना जेवण केल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात दुखू लागते. अशी लक्षणे आढळल्यास ईसीजी काढून हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
3) डोकेदुखी ः
बराच वेळ डोके दुखत असेल तर ते उच्च रक्तदाब, डोळे खराब होणे आणि स्पॉंडिलायटीसचे लक्षण मानले जाते. त्यामुळे वारंवार दीर्घकाळासाठी डोके दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याकरिता आपल्या शरीराचा एक्स-रे काढणे आणि रक्तदाब तपासणे आवश्यक असते. त्यानंतर आपल्यावर आवश्यक ते उपचार केले जातात.
4) भूक न लागणे, वजन कमी होणे
काही जणांना भूक न लागण्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते. भूक न लागणे आणि त्याचवेळी वजनही कमी होणे, अशक्तपणा जाणवणे, संध्याकाळच्या वेळेला बारीक ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. ही लक्षणे क्षयरोगाची (टीबी) असू शकतात. खोकला झाला तरच ते टीबीचे लक्षण असते असे समजू नका. जर फुफ्फुसात क्षय रोग झाला असेल तरच आपल्याला खोकला होतो. शरीराच्या दुसऱ्या भागात क्षयरोग झाला असेल तर आपल्याला खोकला येत नाही.
5) हाडे वारंवार दुखणे
तुमची हाडे जर वारंवार दुखत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन “डी’ची कमतरता आहे. या समस्येवर आज उद्या उपचार करू अशी चालढकल केली तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. शहरी जीवनशैलीत अनेकांना सुर्यप्रकाशात जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू लागते. दिवसभर वातानुकुलीत कार्यालयात काम करणे आणि संध्याकाळी घरी परतणे अशा वेळापत्रकामुळे आपल्याला सूर्यप्रकाशाचा अनुभव शहरी जीवनात कधी घेताच येत नाही. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे दुखू लागतात. त्यामुळे असे लक्षण जाणवल्यास डॉक्टरांना तातडीने भेटा. कोणी तरी सांगितले म्हणून व्हिटॅमिन डी आहारातून घेण्याचा प्रयत्न करू नका.