कोणत्या पृष्ठभागांवर करोना अधिक काळ तग धरतो? मुंबई IITच्या विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण संशोधन

नवी दिल्ली – कापड किंवा कागदापेक्षा काच आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठ भागावर करोनाचा विषाणू अधिक काळ तग धरून राहतो असा निष्कर्ष एका पहाणीत निघाला आहे. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे.

माणसाच्या शिंकण्याच्या तुषारातून करोनाचे विषाणू एखाद्या पृष्ठभागावर जमा होतात. हा पृष्ठ भाग जर काच किंवा प्लॅस्टिकचा असेल तर त्यावर ते अधिक काळ तग धरून राहतात आणि तेथून त्याची लागण अन्यत्र होते असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

हे विषाणु ओलसर तुषारांच्या आधारेच जीवंत राहु शकतात. त्यामुळे कपडा किंवा कागदावर हे तुषार पडले तर त्यातील ओलसरपणा लगेच नाहीसा होत असल्याने हे विषाणु फार काळ तग धरू शकत नाही. त्या उलट काच किंवा प्लॅस्टिकवर ओलसरपणा बराच काळ शिल्लक राहात असल्याने त्या आधारे हे विषाणू तेथे तग धरून राहु शकतात असे या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या संशोधनानुसार प्लॅस्टिकच्या पृष्ठ भागावर सात दिवसांपर्यंत हा विषाणू तग धरू शकतो तर काचेवर तो चार दिवसांपर्यंत तग धरू शकतो. कपडा किंवा कागदावर तो केवळ तीन तास ते दोन दिवसांपर्यंत तग धरू शकतो.

त्यामुळे रूग्णालयांमधील फर्निचर हे काच, स्टेनलेस स्टील, लॅमिनेटेड लाकूड अशा स्वरूपांच्या मटेरियलचे असेल तर ते कपड्याने झाकलेले असावे अशी शिफारस या संशोधकांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणच्या बसण्याच्या जागाही त्यावर कापड अंथरून ठेवाव्यात असेही त्यांनी सुचवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.