मुख्यमंत्र्यांना माजी खासदार आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख कटके यांच्याकडून निवेदन
थेऊर (वार्ताहर) – राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा देत असतानाच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शिक्रापूर ते शिरूर पर्यंत पुणे-नगर महामार्गाच्या रूंदीकरणासह हवेलीतील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संलग्न ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना प्राधान्याने सुरू करावा, यासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन माजी खासदार, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
जिल्ह्यातील प्रश्नांबाबत आढळराव पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट जिल्हाप्रमुख कटके यांनी घेतली. यावेळी माजी आमदार शरद गोरे उपस्थित होते. यावेळी कटके यांनी जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांपैकी नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शिक्रापूर ते शिरूरपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणाला परवानगी मिळण्यासह हवेलीच्या पूर्व पट्ट्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडीत असलेला आठ वर्षांपासून बंद यशवंत कारखाना तातडीने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याविषयीची मागणी केली. शिक्रापूरपासूनच्या रस्ता रूंदीरणाबाबत सातत्याने मागणी केली आहे.
यशवंत कारखाना सुरू करण्याबाबतही काही वर्षांपासून शेतकरी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, या महत्त्वपूर्ण प्रश्नी निर्णय होत नसल्याचे तसेच गेल्या पंचवार्षीकमध्येही भाजपकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे कटके यांनी सांगितले. यशवंत कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेत शिवसेना कधी पुढे आलीच नसल्याचा आरोप विरोधकांकडून वेळोवेळी केला आहे. परंतु, भाजपच्या संबंधीत यंत्रणेने कधीही शिवसेनेच्या नेतृत्त्वाला विश्वासात घेतले नाही. आता, हा विषय मुख्यमंत्र्यांनी अजेंड्यावर घ्यावा. कारखाना सुरू होण्याच्या प्रक्रियेला वेग येणे गरजेचे आहे. कारखाना कुठल्याही स्थितीत पूर्ण सुरू करण्यासंदर्भात शिवसेना आग्रही आहे.
यशवंत कारखाना शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळेच शेतकरी सभासदांचे कोठेही नुकसान होऊ नये, असे आमचे प्रयत्न आहेत. या बाबींवरच मुख्यमंत्रीही भर देत असून याकरिता विविध तज्ज्ञांशीही चर्चा करून पर्याय पडताळून पाहिले जाणार आहेत. कारखाना सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गंभीर असून तसे प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेत माजी खासदार आढळराव पाटील स्वत: सामील झाले आहेत.
-ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा प्रमुख, शिवसेना.