मुंबई – मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक उद्या, 22 सप्टेंबर रोजीच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्याप्रकरणी युवासेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय रद्द ठरवत उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट प्रणित युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या दोघांमध्येच प्रमुख लढत रंगणार आहे. 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, मूळ वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवार, 22 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र, अचानक त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी रात्री ही निवडणूक स्थगित केल्याचे पत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले होते.