प्रभात वृत्तसेवा – येत्या एक एप्रिल 2021 पासून बर्याच गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. ज्यांची खाती अन्य सरकारी बँकांमध्ये विलीन झालेल्या ‘या’ आठ सरकारी बँकांमध्ये आहेत, त्यांना सतर्क करणारी ही बातमी आहे. कारण एक एप्रिल 2021 पासून या आठ बँकांच्या ग्राहकांची सर्व जुनी चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोड अवैध होतील. त्यानंतर ते लोक ना पैसे जमा करू शकणार, ना पैसे काढू शकणार. एक एप्रिलनंतर त्यांचे चेकबुक स्क्रॅप पेपरसारखे होईल.
* बँकेत जाऊन नवीन चेकबुकसाठी अर्ज करा
जर आपले खातेदेखील ‘या’ आठ सरकारी बँकांमध्ये असेल तर ही तातडीची कामे त्वरित मार्गी लावा. कारण होळीचा सण जसा जवळ आलाय, तशाच बँकेच्या सुट्ट्याही जवळ आल्या आहेत. आज आणि सोमवारी बँका काम करतील. म्हणून वेळ न दवडता आपल्या बँक शाखेत जा आणि नवीन चेकबुकसाठी अर्ज करा. जर तुम्ही आता चेकबुकसाठी अर्ज केला तर तुम्हाला 8-10 दिवसांनी एक नवीन चेकबुक मिळेल.
सरकारने ज्या आठ बँकांचे विलीनीकरण केले आहे, त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
- देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले, जे एक एप्रिल 2019 पासून प्रभावी झाले.
-
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे.
-
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे.
-
आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाले आहेत.
-
अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. एक एप्रिल 2020 पासून अंमलात आले आहे.
या बँकांच्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत एक एप्रिल 2021 पासून नवीन चेक बुक घ्यावे लागेल. तथापि, सिंडिकेट आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सिंडिकेट बँकेची सध्याची चेक बुक 30 जून 2021 पर्यंत वैध असेल. त्यानंतर नवीन चेक बुक घ्यावे लागेल.