Ram Mandir – अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा जरी झाली असली तरी मंदिराचे बांधकाम अजुनही सुरूच आहे. त्यासंदर्भात आता श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
मंदिराची एकूण पाच शिखरे असणार आहेत व त्यातील तीन आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. मुख्य शिखर १६१ फूट उंचीचे बनवले जाते आहे. त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. नंतर भगवान रामाचा दरबारही बनवला जाणार आहे.
हे सगळे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल व त्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले. यावर्षीच २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली होती व त्यावेळी हजारो प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मंदिराचे निर्माण कार्य २०२० पासूनच सुरू आहे. पंतप्रधानांनीच ५ ऑगस्ट रोजी आधारशिला ठेवली होती व तेंव्हापासून काम सुरू आहे.