करोनासंदर्भात केंद्र सरकारकडून राज्य सरकारला महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली – देशातील सक्रिय रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ दिसून येत आहे. आज देशातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1 लाख 45 हजार 634 एवढी झाली. यातील 74 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रामधील आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सुद्धा दैनंदिन रुग्ण संख्येत आता वाढ दिसून येत आहे. पंजाब, जम्मू काश्‍मीरमध्येही दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार आठवड्यांमध्ये साप्ताहिक रुग्ण संख्यावाढीचा कल दिसून येत आहे. साप्ताहिक रुग्णसंख्या 18,200 वरून 21,300 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या 4.7 टक्‍क्‍यांपासून 8 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला व यवतमाळ, येथे साप्ताहिक रुग्णसंख्या वाढली आहे.

पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात साप्ताहित रुग्ण संख्या दर हा राष्ट्रीय रुग्ण संख्येच्या सरासरीहून जास्त आहे. राष्ट्रीय रुग्ण संख्या सरासरी 1.7 टक्के आहे. महाराष्ट्राचा सर्वाधिक साप्ताहिक रुग्ण संख्या दर 8.10 टक्‍के आहे. या सर्व राज्यांना दैनंदिन रुग्णवाढीकडे काटेकोर लक्ष देण्यास केंद्राने सुचवले आहे.

निदान चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करून एकूणच निदान चाचण्या वाढवाव्यात. सर्व नकारात्मक रॅपिड निदान चाचण्यांनंतरही आरटीपीसीआर चाचण्या करून घ्याव्यात, जेणेकरून चाचण्या नकारात्मक आलेले रुग्णसुद्धा वगळले जाणार नाहीत. निवडक जिल्ह्यांमध्ये कडक आणि सर्वंकष सर्वेक्षणावर भर द्यावा तसेच कंटेनमेंट नियम कडकपणे राबवावेत.

नवीन बदलत्या विषाणू स्ट्रेन बाबत चाचण्या आणि जीनोम सिक्वेन्स मॅप द्वारे नियमित दक्षता बाळगावी. अधिक मृत्यू संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक व्यवस्था राबवण्यावर भर द्यावा, असे केंद्राने म्हटले आहे.

महाराष्ट्रात सातत्याने नव्याने मोठी रुग्णसंख्या आढळत आहे. ती संख्या आता 6,281 इतकी आहे. त्यानंतर केरळमध्ये 4,650 इतकी तर कर्नाटकमध्ये 490 नवीन रुग्णांची नोंद आहे. केवळ, महाराष्ट्र आणि केरळमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 77 टक्के इतकी नवीन रुग्णसंख्या आहे.

गेल्या 24 तासात देशाभरात एकूण 101 मृत्यूंची नोंद झाली आहे. नवीन मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 40 मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये 13 तर पंजाबमध्ये आणखी 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.