करोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान
मुंबई – कर्तव्य बजावताना करोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.
महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यूदेखील करोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
करोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे राऊत यांनी सांगितले.