‘ड’ जीवनसत्वाची कमतरता

ड जीवनसत्व व हृदयाला रक्तपुरवठा होण्यामध्ये भूमिका

जगभरात जास्तीत-जास्त मृत्यू होण्याचे कारण म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज हा आजार होय. सगळ्याच देशांमध्ये या आजाराची झळ पोहोचताना दिसत असून भारतात मात्र जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा आजार कमी वयातच होत असल्याचे निरीक्षणात आले आहे. या आजारात हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे अचानक मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. भारतात या आजारापासून रुग्णांचा बचाव करणे अधिक कठीण आहे. कारण, येथे क्रीनिग, रोगनिदान आणि कोरोनरी आर्टरी डिसीज या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असणा-या वैद्यकीय सुविधांचाच अभाव आहे. परिणामी, येत्या १५ते २० वर्षात भारतात कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन, ढिसाळ जीवनशैली, शरिरातील लिपीड्सचे उच्च प्रमाण, मधुमेह आणि मर्यादेपेक्षा अधिक वजन यामुळे भारतीयांना कोरोनरी आर्टरी डिसीज, अंजायना किंवा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. वैद्यकीय व वैज्ञानिक निरीक्षणानुसार, आता असे सिद्ध झाले आहे की, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज बळावण्यास पोत्साहन मिळते. भारतात, शरीर प्रदर्शन करण्यास सांस्कृतिक निर्बंध असल्यामुळे त्वचेला ड जीवनसत्वाचा पुरवठा कमी होतो. स्कीन पिगमेंटेशन किंवा गर्दीच्या ठिकाणी छोटय़ाशा घरांमध्ये, जिथे सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, अशा ठिकाणी ब-याच जणांनी दाटीवाटीने राहणे या कारणांमुळे ड जीवनसत्वाचा भारतीयांमध्ये अभाव जाणवतो.

ड जीवनसत्व हे अन्न व प्रखर सूर्यप्रकाशातून मिळत असून हे स्निंग्धांश विरघळवणारे जीवनसत्व आहे. याचे अन्नाद्वारे ग्रहण केल्यानंतर, शरिरात त्याचे शुद्ध ड-३ जीवनसत्वात (कोलेकॅल्सिफेरॉल) रुपांतर होते. धमन्यांच्या भित्तिकांमध्ये स्निग्धांश साठून राहते व जेव्हा ड जीवनसत्वाची कमतरता असते, तेव्हा त्या स्निग्धांशाच्या गुठळ्या होतात. ड जीवनसत्वाची कमतरता असलेल्या रुग्णांमध्ये पेशींना सूज आल्याचे दिसून आले असून यामुळे हृदयविकार व धमन्यांचे आजार उद्भवतात.

रक्तदाब नियमित ठेवण्यात तसेच, हृदयाच्या स्नायूंच्या पेशींची योग्य ती वाढ होण्यातही ड जीवनसत्वाचा मोलाचा वाटा असतो. ड जीवनसत्वाच्या पातळीचा धमन्यांच्या आतील भागातील मऊ स्नायूंवर थेट परिणाम होतो. ड जीवनसत्व कमी असल्यास धमन्यांच्या भित्तिका कठीण बनतात व त्यातून सुयोग्य प्रमाणात रक्तपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हृदयाची आकुंचन पावण्याची प्रक्रियाही वाढत असून हृदयाच्या झडपा अधिक कठोर आणि जाड होतात. त्यामुळे, हृदयाचे कार्य व्यवस्थित होत नाही. कोरोनरी आर्टरी डिसीज होण्यासाठी दुसरे महत्वाचे कारण असलेला मधुमेहसुद्धा ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो.

ड जीवनसत्वाच्या अल्प पातळीचे परिणाम काडओव्हॅस्क्युलर सिस्टमवरही दिसून येतात. ड जीवनसत्वाची कमतरता असलेल्या रुग्णांमध्ये एकूण कोलेस्टेरॉल, एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड यांचेही रक्तातील प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहेत. ज्या रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता साधारण पातळीवर दिसून आली, त्यांच्यात मात्र फारच कमी समस्या असल्याचे लक्षात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.