#लोकसभा2019 : मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना महत्त्व

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर चर्चा

भोपाळ – मध्य प्रदेशातील अखेरच्या टप्प्यात आठ मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि कॉंग्रेस सरकारच्या काळातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हेच प्रचाराचे मुद्दे आहेत. गत वेळी जिंकलेल्या सर्व जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे आठ मतदारसंघ असलेल्या माळवा विभागात भाजपपेक्षा कॉंग्रेसला जास्त जागा मिळाल्या होत्या.

केंद्रातील भाजप सरकार किंवा विद्यमान खासदारांच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू नये या उद्देशानेच भाजपने सातपैकी पाच खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. 2014 मध्ये भाजपने रविवारी मतदान होत असलेल्या आठही जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण यापैकी रतलाम मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे कांतीलाल भुरिया यांनी विजय मिळविला होता.

भाजप सरकारच्या काळात मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि त्यात पाच शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू यावर कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रचारात भर दिला होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फायदाही झाला होता. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता जाण्यात शेतकऱ्यांवरील गोळीबार हे मुख्य कारण ठरले होते. तसेच सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आश्वासनाचा फायदा झाला होता. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही, हा भाजपने प्रचाराचा मुद्दा केला आहे. शेतकऱ्यांवरील मंदसौर मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.