मोठय़ांप्रमाणेच लहान मुलांची खोलीही (चिल्ड्रन्स रूम) तितकीच महत्त्वाची असते. बदलत्या राहणीमानानुसार, मुलेही ‘अॅडव्हान्स’ झालीत. त्यामुळे गाजलेली आणि प्रसिद्ध कार्टून्स तसेच विशिष्ट चित्रापुरती ही खोली मर्यादित नाही. आताच्या पिढीला त्यांच्या मनासारखे आणि मनाप्रमाणे सर्व काही लागते.
लहान मुलांच्या खोलीतील फर्निचर डिझाईन करताना केवळ चित्रविचित्र आकार आणि भडक रंग यांना प्राधान्य न देता, मुले वापरणार असणारी रूम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून खोली सजवली पाहिजे. त्यात कल्पकता आणि सौंदर्य असावेच, मात्र रंगांचे बंधन टाळावे. मुलांसाठी खोली डिझाईन करताना त्यांचा वयोगट आणि आवडी यांचा मेळ साधणे फारच महत्त्वाचे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, मुलांचं वाढतं वय आणि त्यानुसार शरीरात होणारे बदल. मुलांचे शरीर व मन वेगाने वाढणारे असते. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा सतत बदलत्या असतात. यासाठी मुलांचे पाच ते बारा वर्षे तसेच बारा ते पुढे सोळा-सतरा वर्षे असे वयोगट बनवल्यास त्यांची खोली डिझाईन करणे थोडेसे सोपे जाईल.
लहानग्यांच्या खोलीमध्ये कमीत कमी फर्निचर आणि जास्तीत जास्त मोकळी जागा हे समीकरण नेहमी पक्के असले पाहिजे. पाच ते बारा वर्षे वयोगटासाठी तर त्यांची खोली हे दुसरे मैदानच असायला हवे. या वयोगटातील मुले चंचल, धडपडी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फर्निचर डिझाईन करताना फर्निचरला कुठेही टोकदार कानेकोपरे राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. फर्निचरमध्ये काचेचा वापर, खोलीत लोंबणा-या दिव्यांचा वापर शक्यतो टाळावा. लहान मुले म्हटली की, ती उडय़ादेखील मारणारच. मग हे लक्षात घेऊन फर्निचर दणकटही बनवले पाहिजे.
खोलीतील फर्निचर आटोपशीर बनवतानाच ते सगळ्या गरजादेखील पूर्ण करणारे असले पाहिजे. या मुलांना ‘बंक बेड’सारख्या फर्निचरची आवड असते, त्यामुळे बेडरूममध्ये तशी सुविधा द्यायला काहीच हरकत नाही. ‘बंक बेड’मुळे जागादेखील वाचते. यांच्यासाठी वॉर्डरोब डिझाईन करताना त्यांना त्यांच्या हाताने वस्तू काढता-ठेवता येतील, अशा प्रकारे डिझाईन केल्यास त्यांना आनंद मिळू शकतो. या वयात मुलांना रेघोटय़ा मारणे, फर्निचरवर स्टीकर चिकटवणे हे उद्योगदेखील फारच प्रिय असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून फर्निचरसाठी लॅमिनेट निवडावे, जे पटकन किंवा कालांतराने स्वच्छ करता येईल. मुलांच्या खोलीत शक्यतो महागडे लाकूड वापरू नये.
मुलांची खोली म्हटली की, केवळ आराम करणे किंवा झोपण्यासाठीची रूम नव्हे, तर त्यांना एकांतपणे अभ्यास करता यावा, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यामुळे चिल्ड्रन्स रूममध्ये स्टडी टेबल, पुस्तकांसाठी कपाट असावे, असे त्यांना वाटते. मात्र, खोलीत किती जागा आहे, याचा विचार करूनच स्टडी टेबल बनवायचे की नाही, हे ठरवावे. पुस्तकांची संख्या पाहून पुस्तकांचे कपाट बनवल्यास अधिक चांगले होईल. मुलांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व असते आणि विचारशक्तीही आणि त्यांच्या खोलीच्या सजावटीमधून तेच डोकावले, तर बरे.