उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही आयात करा

नाराज नेत्यांचा प्रचार प्रमुखांना सल्ला : पश्‍चिम महाराष्ट्र प्रचार समिती बैठकीला काही निष्ठावानांची अनुपस्थिती

पुणे – उमेदवार बाहेरून आणणार तर प्रचार करायला आणि सतरंजा उचलायलाही बाहेरूनच कार्यकर्ते आणा, असा सज्जड दम देत कॉंग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बुधवारी झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या प्रचार समितीच्या बैठकीला पाठ फिरवली.

या बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे सोडले तर अन्य नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित नव्हते. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, पक्षप्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आमदार रामहरी रूपनवार, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते. रुसवा काढून आणलेले माजी आमदार उल्हास पवार यांना या बैठकीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तर अन्य माजी नगरसेवक उपस्थित होते.

पुण्याची खासदारकीची जागा राष्ट्रवादीने कॉंग्रेससाठी सोडली. मात्र, कॉंग्रेसला यासाठी पक्षात एकही सक्षम उमेदवार सापडत नाही अशी स्थिती निर्माण झाली. यासाठी माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यामध्ये जुन्या आणि इच्छुक निष्ठावान कार्यकर्त्यांची समजूत काढण्याच्या बहाण्याने पक्षाने राज्य पातळीवरून ठरवलेल्या उमेदवाराविषयीच्या मतांची चाचपणी केली. त्याचवेळी खासदारकीचा उमेदवार पक्षाच्या बाहेरून आणणार असल्याची कुणकुण शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

उमेदवार बाहेरून आयात करायचा आणि त्याचे प्रचाराचे काम निष्ठावान कार्यकर्त्यांनी करायचे हे पटत नसल्याचे कारण सांगून पदाधिकारी आणि नगरसेवक या पश्‍चिम महाराष्ट्र प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे येथून पुढे खासदारकीचा जो उमेदवार उभा राहिल त्याच्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते शक्ती आणि निष्ठा पणाला लावून काम करतील का, याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोशल मीडिया वॉर
निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे, राज्य प्रशासनातील मुद्दे, लोकसभेचे मतदारांचे प्रश्‍न यावर जास्तीत जास्त भर प्रचारामध्ये करण्यात यावा. तसेच हे सर्व मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. ही लोकसभेची निवडणूक सोशल मीडिया वॉर आहे, ती आपण जिंकलीच पाहिजे, असे मत या बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. तसेच या निवडणुकीमध्ये प्रचार करताना टाईम मॅनेजमेंट करणे गरजेचे आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही चर्चा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यातील स्थानिक ठिकाणी इतर पक्षांसोबत केलेल्या आघाड्या तोडणे गरजेचे आहे. देशातील हुकूमशाही, भ्रष्टाचार, राफेल डील, संविधानाला धोका याच मुद्द्यांबरोबर राज्यातील दुष्काळ आणि महाराष्ट्रातील भाजप सेनेचे भ्रष्टाचारी मंत्री यावर देखील प्रचाराचा रोख असणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन पाटील यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)