तंत्रज्ञान : युविया टीव्हीचे सीईओ परेश मुथा यांची माहिती
कामशेत – तंत्रज्ञानाभावी भारतातील एलईडी, एलसीडी टीव्ही उत्पादक कंपन्या चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान या राष्ट्रांवर अवलंबून आहेत. टिव्ही बनविण्यासाठी लागणारे ओपन सेल पॅनल हे आयात करावे लागते आणि आयात शुल्कात दिलेली सूट रद्द करण्यात आल्याने यापुढे टीव्हीच्या किमती 30-40 टक्क्यांनी वाढणार आहेत, अशी माहिती युविया टीव्हीचे सीईओ परेश मुथा यांची माहिती दिली.
एलसीडी टीव्हीच्या ओपण सेल पॅनलला गेली वर्षभर माफ केलेले 5 टक्के आयात शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले. यामुळे पॅनल उत्पादकांनीही किमती वाढविल्याने टीव्हीला दरवाढीचा “शॉक’ बसणार आहे. यामुळे केंद्र शासनाकडून आकारण्यात आलेल्या आयात शुल्कात सवलतीची अपेक्षा भारतीय टीव्ही उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरपासून एका वर्षाकरिता 15.6 आणि त्यापेक्षा अधिक इंचाचा एलसीडी, एलईडी टीव्हीच्या ओपन सेल पॅनलवर असलेले 5 टक्के आयात शुल्क माफ केले होते. ते आता 1 ऑक्टोबरपासून पुन्हा लागू झाले आहेत. त्यामुळे टिव्हीच्या किमती वाढणार आहेत.
ओपन सेल पॅनलचे उत्पादन केवळ चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्ये होते. टीव्ही पॅनलमधील 70 ते 80 टक्के उलाढाल चायनीज कंपन्यांकडून होते. त्यामुळे पॅनलबाबत जगभरातील उद्योजक या देशांवर अवलंबून आहेत.
भारतातील टीव्ही उद्योग अधिक सक्षम व्हावा, आत्मनिर्भर व्हावा म्हणून आयात शुल्क माफ केले होते. मात्र, चायनीज कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ केली आहे आणि त्यात केंद्र सरकारकडून पुन्हा आयात शुल्क आकारण्यात येत असल्याने भारतातील “मेक इन इंडिया’ अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे भारतीय टीव्हीच्या किमतीत 35 ते 40 टक्क्यांनी वाढ होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना टिव्ही घेणे
अवघड होईल.
– परेश मुथा, सीईओ, युविया टीव्ही.