पुणे – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच महापालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यांतर्गत शहरातील राजकीय बोर्ड, बॅनर्स तसेच जाहिराती काढण्यास सुरुवात केली असून सार्वजनिक ठिकाणी असलेले माहिती फलक तसेच पालिकेच्या मालकीच्या जागांवरील शासकीय जाहिरातीमधील राजकीय नेत्यांची नावे झाकण्याचे काम रविवारी सुरू केले आहे.
आचारसंहिता कालावधीत शासकीय कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माहिती फलक, दिशादर्शक कमानी, स्ट्रीट फर्निचर, वास्तू, इमारतींमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे, पक्षांची चिन्हे छाकून ठेवली जातात. महापालिकेकडून संपूर्ण शहरात असे माहिती फलक तसेच दिशादर्शक कमानी लावण्यात आलेल्या असून त्यावर नगरसेवकांची तसेच त्यांच्या पक्षाची नावे आहेत.
ही नावे झाकण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेतले आहे; तर दुसऱ्या बाजूला शनिवारी दुपारपासूनच महापालिकेकडून राजकीय जाहिरातींचे फलक, बोर्ड, फ्लेक्स तसेच झेंडे काढण्यात येत असून रविवारी दिवसभरही हे काम सुरूच होते.
आचारसंहितेची घोषणा होताच महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आल्या असून कोणत्याही स्थितीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.