पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पत्रकार परिषदेत माहिती
पिंपरी – उद्योगनगरीतील गुन्हेगारी रोखणे हे माझ्यासमोरील आव्हान आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी मी शहरात “झिरो टॉलरन्स’ कार्यपद्धत राबविणार आहे, अशी माहिती नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शनिवारी (दि. 5) दिली. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील सर्व घटकांनी एकत्र या, असे आवाहन करीत त्यांनी थेट संपर्क साधण्यासाठी आपला संपर्क क्रमांक जाहीर केला आणि सुरक्षित वातावरणाची हमी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्त पदाचा पदभार त्यांनी संदीप बिष्णोई यांच्याकडून शनिवारी स्वीकारला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. कृष्णप्रकाश म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, यामध्ये आयटी, एज्युकेशन हब आहेत. या सुनियोजित शहरात कामगारांची संख्या अधिक आहे. सर्व घटकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत.
सामाजिक संस्थाच्या माध्यमातून विविध घटकांच्या समस्या सोडविण्यावर माझाभर असणार आहे. अल्पवयीन गुन्हेगारी रोखून, भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.