कोल्हापूर (प्रतिनिधी) – छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजया दशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस बॅंड वाजविण्यात आला. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
तलाठी प्रल्हाद यादव यांनी शाही घराण्याचे प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने अपूर्व उत्साहात सोने लुटले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली.
या सोहळ्यास महापौर माधवी गवंडी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, आमदार सतेज पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदीसह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर शहरासह अनेक तालुक्यातून आलेले नागरिक स्त्री-पुरुष, लहान मुले यांनी दसरा चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता.